ओवळा माजिवडा प्रभागात आमदार प्रताप सरनाईकांच्या संकल्पनेतून शाखा तेथे दवाखाना

ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रात आमदार प्रताप सरनाईकांच्या संकल्पेतून आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाप्रमाणे शाखा तेथे दवाखाना असा हा उपक्रम असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. सध्याच्या दिवसात नागरिकांना आरोग्य सेवा देणे हे सर्वात महत्वाचे काम असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे आव्हान गेल्या ३ महिन्यापासून सगळ्यांसमोर असताना आता पावसाळा सुरु होत आहे. पावसाळ्यातही किरकोळ आजार नागरिकांना होत असतात तसेच इतर साथीचे आजार पसरण्याची भीती असते. या सर्व काळात अजूनही बरेचसे खासगी दवाखाने अद्याप सुरु झालेले नाहीत. त्यामुळे ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व शाखांमधून आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम आता राबवला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी १३ जून पासून हा आरोग्य उपक्रम सुरु होणार असून तो पुढील ४५ दिवस चालणार आहे. या माध्यमातून हजारो नागरिकांची सामान्य आरोग्य तपासणी आणि विनामूल्य औषध वाटप करण्यात येणार आहे.
ओवळा-माजिवडा मतदार संघातील शिवसेनेच्या शाखांवर युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे. १३ जून ते २७ जुलै या दरम्यान प्रत्येक दिवशी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत शिवसेनेच्या शाखेत १०० जणांची तपासणी केली जाणार असून त्यासाठी १०० कुपन आधीच वाटले जातील. येणाऱ्या नागरिकांचे शरीराचे तापमान आणि नाडी तपासणी मशीनने केली जाईल. पावसाळ्यात साधारण नागरिकांना सर्दी, खोकला, कफ, ताप, डोकेदुखी अशा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी असतात. लोक त्यासाठी मेडिकलमधून सिरप किंवा गोळ्या घेऊन येतात. त्यामुळे ज्या नागरिकांना अशा सर्वसामान्य आजारांसाठी औषधे लागतील ती औषधे विनामूल्य शिवसेना शाखेतून दिली जातील. या ४५ दिवसात एकूण साडेचार लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading