सोमवार पासून भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात

देशाचा कारभार लोकाभिमुख असावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील हे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सोमवारपासून २० ऑगस्टपर्यंत झंझावाती जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हास्तरीय आणि स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपामय होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदात सामील होण्याचा बहूमान आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांना देण्यात आला. केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला २७ मंत्रिपदे मिळाली असून, वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्याला जिल्ह्यासह कोकणातून नागरिकांची पसंती मिळत आहे. त्यानिमित्ताने जन आशीर्वाद घेण्यासाठी भाजपाकडून यात्रा काढली जात आहे. आनंदनगर चेकनाक्याहून १६ ऑगस्टला यात्रेला सुरुवात होईल. तर २० ऑगस्टला भिवंडी तालुक्यात या यात्रेची सांगता होईल. या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून नागरिक, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच विविध योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, एमआयडीसीतील जमीन मालकांबरोबर बैठक, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तीकारांबरोबर बैठक, भूमिपूत्रांशी संवाद, स्वच्छता अभियान, दिव्यांग लाभार्थींशी चर्चा, भाजपाचे समर्थ बूथ अभियान आदी कार्यक्रमांमध्येही मंत्री कपिल पाटील यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading