सुमारे १० वर्षानंतर पृथ्वीवर आदळणा-या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार

सुमारे १० वर्षानंतर पृथ्वीवर आदळणा-या लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. शुक्रवार १३ एप्रिल २०२९ या दिवशी अपोफिस नावाचा ३४० किलोमीटर आकाराचा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती. पण हा लघुग्रह पृथ्वीवर न आदळता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ३१ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. अपोफिस या लघुग्रहाचा शोध ३ शास्त्रज्ञांनी १९ जून २००४ मध्ये लावला होता. शास्त्रज्ञ यावर नजर ठेवून होते. अधिक चैत्र कृष्ण अमावास्या शुक्रवार १३ एप्रिल २०२९ हा दिवस त्यादृष्टीनं मोठा धोक्याचा दिवस समजला जात होता. कारण हा लघुग्रह या दिवशी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता होती. पण आता नव्या संशोधनानुसार हा दिवस आता लकी ठरणार असून या दिवशी ३४० किलोमीटर आकाराचा हा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३१ हजार किलोमीटर अंतरावरून जाणार असल्यानं या लघुग्रहाचा अभ्यास करण्याची संधी शास्त्रज्ञांना मिळणार आहे. त्या दिवशी पृथ्वीच्या काही भागातून हा लघुग्रह साध्या डोळ्यांनीही पाहता येईल असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ५२ हजार वर्षापूर्वी ६० मीटर आकाराचा २० लाख टन वजनाचा एक अशनी पाषाण लोणार येथे आदळला होता. आजही तेथे दोन किलोमीटर व्यासाचे दीडशे मीटर खोल अशनी विवर पाहण्यास मिळते. आता अंतराळ विज्ञानात खूप प्रगती झाली आहे. त्यामुळं एखादा धुमकेतू किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाल्यास शास्त्रज्ञ पृथ्वीला नक्कीच सुरक्षित ठेवू शकतील. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading