सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घरात सायबर संस्कृती जोपासण्याचा प्रशांत माळींचा सल्ला

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरिता आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात सायबर सेफ संस्कृती जपावी लागेल असा सल्ला सायबर तज्ज्ञ  प्रशांत माळी यांनी दिला. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. माळी यांनी त्यांच्या व्याख्यानात मोबाईलवर तंत्रज्ञानावर आधारित गुन्हे आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या आधार घेऊन होत असलेली आर्थिक फसवणूक यावर प्रकाशझोत टाकून तरुण आणि ज्येष्ठांना सावध राहण्याचा सल्ला दिला. विशेषतः पालकांनी मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्या आपल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. मॅट्रीमॉनिअल गुन्ह्यात हल्ली उच्चशिक्षित तरुण-तरुणीही बळी पडत आहेत. अशा साईटवर केवळ फेक फोटो आणि परिचयाला भुलून आपली आर्थिक फसवणूक करून घेतात. सायबर गुन्हे रोखण्यासाठी कायदे झाले आहेत, पण त्याची परिपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी आणखी बराच काळ जाणार आहे. सध्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेले व्हाट्सऍप क्राइम हब झाले आहे. आपल्याला पाठवलेले वादग्रस्त किंवा पोर्नोग्राफी व्हिडीओ डाउनलोड करणे, पाहणे आणि पुढे पाठवणे हा गुन्हा असूनही तो सर्रास होत आहे. मोबाईलवरील ट्रू कॉलरसारखे ऍप त्रासदायक ठरू शकतात. हल्ली लहान मुले सतत मोबाईलवर असतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. तुमची मुले इंटरनेटवर काय करतात? याकडे लक्ष ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. मोबाईल, जीमेल, फेसबुक, ट्विटर आदी वापरताना काय काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मोबाईलवरील फ्रंट कॅमेरा सेल्फी घेतल्यानंतर स्टिकर लावून बंद करा, जेणेकरून गुन्हेगारीला मदत करणाऱ्या ऍपच्या माध्यमातून तुमचे फेस रिडींग होणार नाही. मोबाईल, जीमेल, फेसबुक यांचे पासवर्ड नियमितपणे बदलावेत. गुगलचा मार्गदर्शक म्हणून नक्की वापर करा. फेक स्कीमचा शोध घेऊन त्यापासून सुरक्षित राहू शकता. त्या स्कीमचे नाव आणि स्पेस देऊन फ्रॉड असे टाईप केले की गुगलमार्फत तपास सुरू होऊन त्याची माहिती मिळू शकते. न मिळाल्यास पुन्हा चार-पाच दिवसांनी असा प्रयत्न करावा. टेक्नोसॅव्ही व्हा पण पूर्णपणे त्यावर अवलंबून राहू नका, अशा अनेक सूचना प्रशांत माळी यांनी केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading