सलग तिस-या दिवशी ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यात पाऊस जोरदार हजेरी लावत असून सलग तीन दिवस १४० मिलीमीटरच्या वर पाऊस होत आहे. या पावसानं सखल भागात पाणी साचण्याबरोबरच झाडांच्या फांद्या तुटणे आणि झाडे पडणे असे प्रकार झाले असून यामुळं लाखोंचं नुकसानही झालं आहे. काल तर जोरदार पावसाबरोबरच सोसाट्याचा वाराही सुटला होता. त्यामुळं संध्याकाळनंतर बाहेर फिरणा-या ठाणेकरांना छत्री, रेनकोट असूनही पावसानं ओलचिंब करून टाकलं होतं. या जोरदार पावसामुळं काल संध्याकाळी भर बाजारपेठेतही १ ते दीड फूट पाणी साचलं होतं. विशेषत: काल संध्याकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. गेल्या १२ तासात म्हणजे सकाळी साडेआठ पासून रात्री साडेआठ पर्यंत ठाण्यात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नंतरच्या १२ तासात म्हणजे रात्री साडेआठपासून सकाळी साडेआठ पर्यंत ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासात ठाण्यात १६४ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. काल झाडं पडण्याच्या २७, फांद्या पडण्याच्या ९ तर पाणी साचण्याच्या १८ घटना घडल्या. गेल्या तीन दिवसात जवळपास साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस होऊनही गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पावसाची सरासरी ही कमीच राहिली. आजपर्यंत २ हजार १९ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्यावर्षी आजपर्यंत २ हजार ७८९ मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे जवळपास ७७० मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. हवामान विभागानं पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading