सर्वांनी मिळून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करु – उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळयाची जोरात तयारी सुरु असून सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खारघर येथे केले. २०२२ या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी १४ एप्रिल पासून उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, सुरक्षाव्यवस्था, वाहनांसाठी पार्किंग, प्रवेशव्दार, विविध ठिकाणांहून नवीमुंबईला जोडणारे रस्ते अशा मूलभूत सेवा सुविधांसाठी आवश्यक साधन सामग्रीबाबत मुद्देसूद आढावा घेतला. यासाठी श्री सदस्य हे शासन आणि प्रशासनाला सहकार्य करतील अशा सूचना दिल्या. महाराष्ट्र भूषण या पुरस्कार वितरण सोहळयासाठी ३०६ एकर क्षेत्रात तयारी सुरु आहे. या कार्यक्रमासाठी आसन क्षमता १८ लाख ३६ हजार लोकांसाठी आहे. सार्वजनिक वाहतुकीकरिता बस, रेल्वे, कॅब ८ लाख ४३ हजार २४०, खाजगी बस ९ लाख १५ हजार ७६०, खाजगी कार ७७ हजार एवढे लोक येतील. याकरिता पार्किंगची उपलब्धता १६ हजार ७८५ एवढी आहे.
सभा मंडपात उत्तर दिशेला वैद्यकीय केंद्र, पाणी टँकर, रुग्णवाहिका, कार्डियाक रुग्णवाहिका, मोबाईल टॉयलेट या सर्व व्यवस्था असणार आहेत. तर सभागृहाच्या पश्चिमेला वाय-१ ते वाय-१३ स्टेज (प्रतिबंधित क्षेत्र) असेल. तर ब्लॉक २,३,४,५,६,७ असे असणार आहेत. ब्लॉक ४ मध्ये आरक्षित व्यवस्था असेल.

रोड कनेक्टीव्हीटी – मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याकरिता टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पीटल, गुरुद्वारा, गोल्फचे मैदान, उत्सव चौक, खारघर स्टेशन, मुंब्रा-पनवेल महामार्ग, सोन- पनवेल हायवे या मार्गाने व्यवस्था करण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था-२ ऑरेज झोन – कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या ठिकाणांहून वाहने येतील. कोपरा (330 बस/कार), मुरबीने मैदान (५८० बस/कार ), एक्सस्टोर-१५ ग्राऊंड (४०० बस/कार), सेक्टर-१६, (७७० बस/ कार ), जामशेद ठाकरे एडक्लिफ स्कूल ग्राऊड (४० बस/कार ), केएलआयइएस कलंबोली (४९० बस/ कार), रोडपाली क्रीडा मैदान (१५१० बस/कार), खांदेश्वर रेल्वे स्टेशन मैदान-१ व मैदान-२ अनुक्रमे ७०० ते ५६०, रोडपाली सेक्टर-२० अंतर्गत रस्ते -३४० ते २००, कामोठे अंतर्गत रस्ते-४०० ते २०० असे एकूण पार्किंग -२ ऑरेज झोनमध्ये ७२५० बस तर ४०४० कारची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग-१ मध्ये २२८५ बस तर १९३४ कारची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गुजरात, उत्तर प्रदेश, जव्हार, वाडा, पालघर, डहाणू, भिवंडी, आदी ठिकाणांहून वाहने येतील. पार्किंग -१ मध्ये भारती विद्यापीठ ग्राऊंड उत्सव चौक, सेक्टर-५,६,७ उत्सव चौक सेट्रल, सेक्टर-१९, २० सीबीडी स्टेशन पार्किंग सीबीडी सेक्टर-११ अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था-३ ब्ल्यू झोन – नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, मध्यप्रदेश आदी ठिकाणांहून ७२५० बस तर ३४११ कार करिता पेटगांव, खडकी ग्राऊंड, तळोजा, इनामपुरा ग्राऊंड-१,२, ओवे कॅम्प ग्राऊंड, अमनदूत स्टेशन रोड, वास्तूविहार रोड, तळोजा जेल रोड आदी ठिकाणी वाहतूक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी महापालिका, पोलीस यंत्रणा, सिडको यासर्व यंत्रणांकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, आवश्यक वस्तूंची आकडेवारी मागविण्यात आली होती. सुमारे 2० लाख नागरीक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, इतक्या प्रचंड जनसमुदायाची गैरसोय होऊ नये, याबाबत सर्व यंत्रणांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुखपट्टी (मास्क) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर, रुग्णावाहिका, आवश्यक औषधांचा पुरवठा तैनात ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडून फायर ऑडिट करुन घेण्यात येत आहे. तसेच श्री सदस्यांना आपत्कालिन परिस्थितीत आग विझवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading