सर्वपित्री अमावास्या अशुभ नाही – दा. कृ. सोमण

25 सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी श्रद्धेने पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा दिवस अशुभ कसा असू शकेल ? हा दिवस वाईट कसा असेल ? पितर जर भूलोकात येत असतील तर त्यांचा आशीर्वादच मिळेल ना ? पण जर जिवंतपणी त्याना त्रास दिला असेल तर मात्र ते सोडणार नाहीत. मात्र असे त्रास देणारे कमी लोक असतात. सारासार विचार केला की लक्षात येते की सर्वपित्री अमावास्या ही अशुभ नसते असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. प्राचीनकाळी अमावास्या ही शुभ मानली जात असे. सर्व देव अमावास्येच्या ठिकाणी निवास करतात असे अथर्ववेदात म्हटले आहे. सध्या मात्र अनेकजण अमावास्या अशुभ मानतात. वैशाख अमावास्येला ‘ भावुका अमावास्या ‘ म्हणतात. अमावास्या सोमवारी आल्यास तिला ‘ सोमवती अमावास्या ‘ म्हणतात. या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला १०८ वस्तू अर्पण करतात.आषाढातील अमावास्या ‘ दिव्याची अमावास्या ‘ असते. या दिवशी दिव्यांची निगा राखून दीपपूजन केले जाते. श्रावणातील अमावास्येस ‘ पिठोरी अमावास्या ‘ म्हणतात. भाद्रपद अमावास्या ही ‘ सर्वपित्री अमावास्या ‘ म्हणून मानली जाते. आश्विनातील अमावास्या ‘ लक्ष्मीपूजनाची अमावास्या’ ही मंगलदायक म्हणून मानली जाते. अमावास्येला नदीस्नान करण्याची प्रथाही प्राचीनकाळी होती. भारतात अनेक ठिकाणी अमावास्येच्या दिवशी सूर्यपूजा व व्रतवैकल्ये करण्याचीही प्रथा आहे.
अमा म्हणजे सह, वस् म्हणजे राहणे म्हणजे सूर्य चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या म्हणावं असे सांगण्यात आले आहे. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही अशी व्याख्याही प्राचीन एका ग्रंथामध्ये केली आहे. अमावास्येचा उल्लेख ऋग्वेदात नाही. परंतु सूर्यग्रहण हे अमावास्येलाच होते आणि सूर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. अथर्ववेदात अमावास्येसंबंधी एक सूक्त आढळते. अमावास्येला पृथ्वीच्या संदर्भात चंद्र-सूर्य एकाच रेषेत येतात. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुक्लपक्षात चंद्राचे सूर्यसापेक्ष कोनात्मक अंतर वाढत जाते. पौर्णिमेलाच ते १८० अंश होते. कृष्णपक्षात चंद्र सूर्य यांमधील कोनात्मक अंतर कमी कमी होत जाते. अमावास्येची रात्र आम्हास धनदायी होवो असही एका सूक्तामध्ये सांगितले आहे. रामायणकाली अमावास्या शुभ मानीत होते असे उल्लेखही सापडतात. महाभारतात मात्र काही ठिकाणी अमावास्या ही शुभ मानलेली आहे तर काही ठिकाणी अशुभ मानलेली आहे. अमावास्येचे दोन प्रकार आहेत. एक सिनीवाली आणि दुसरी कुहू म्हणजेच कृष्ण चतुर्दशी युक्त अमावास्येला सिनीवाली म्हणतात आणि शुक्ल प्रतिपदायुक्त अमावास्येला कुहू म्हणतात. अमावास्येच्या दिवशी जास्त अपघात होतात मृत्यूही जास्त होतात असाही एक गैरसमज आहे. एखादा पेशंट सिरियस असेल तर “ अमावास्या टळून जाऊदे, म्हणजे त्याच्या तब्बेतीत सुधारणा होईल “ असे आपण म्हणतो त्यातही काही तथ्य नाही. मृत्यू आणि अमावास्या यांचा काहीही संबंध नाही. अमावास्येला घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण या दिवशी चंद्र-सूर्य दोघेही आपल्या पाठीशी असतात.सर्वपित्री अमावास्या ही निसर्गातील एक घटना असते. ती अशुभ नसते असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading