सरकारी योजनांच्या लाभार्थींचे देशाच्या विकासात योगदान – विनय सहस्रबुद्धे

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. या विकास लाभार्थींची संख्या वाढल्यावरच प्रत्येक कुटुंबापर्यंत वेगाने विकास पोचू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रुपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींचा सन्मान सोहळा आज आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांच्या काळात विविध लोकोपयोगी योजना सुरू केल्या. स्वच्छ भारत योजनेमुळे उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांची संख्या ८० टक्के कमी झाली. त्यामुळे आजारांचे प्रमाण घटले. केवळ सामान्य व्यक्ती हाच केंद्रबिंदू ठेवून योजना आखल्या गेल्या. यापूर्वी आमदार-खासदारांचे नातेवाईकच लाभार्थी ठरत होते. मात्र, आता थेट सामान्यांनाच लाभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा बदल झाला, असे प्रतिपादन विनय सहस्रबुद्धे यांनी केले. मोदी सरकारने आतापर्यंत ५३ कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्या जनतेपर्यंत पोचविण्याबरोबरच, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बहुमोल मदत केली आहे. त्यांच्यामुळेच लाभार्थींपर्यंत विकास पोचू शकला, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत असल्याची स्थिती प्रथमच आठ वर्षांत निर्माण झाली. केंद्र सरकारच्या योजनांमधून वेगाने विकास होत आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने महापालिकांना ५० टक्के निधी दिला होता. स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनच ठाणे शहरातील तलावपाळीचा परिसर सुशोभित झाला आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading