समता संस्कार शिबिराला एकलव्यांचा उत्साही प्रतिसाद

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एकलव्य विद्यार्थ्यांसाठी येऊर येथील अनंताश्रम येथे ५ दिवसांच्या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरातील विविध वस्त्यातून ४८ एकलव्य विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत. या शिबिराचे उद्घाटन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनंताश्रम ट्रस्टचे अध्यक्ष लाड यांनी केले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांची सामाजिक जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने खेळ,कार्यशाळा, व्याख्याने यासारख्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. प्रशांत केळकर, राजेंद्र बहाळकर, संजय मंगला गोपाळ, ऋतेश पंडितराव या प्रशिक्षकांनी मुलांशी विविध ॲक्टिव्हिटीज मधून आपलं आरोग्य, माध्यमांचा प्रभाव अभ्यास कसा करावा, करियर कसं निवडावं, स्वयंशिस्तीचे धडे  अशा विविध विषयावर संवाद साधला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदनाताई शिंदे यांनी मुलांना अंधश्रद्धेचा फोलपणा प्रयोगाद्वारे दाखवला. प्रा. पारखे सर यांनी रात्री मुलांना आकाशदर्शन घडवलं. आसावरी जोशी यांनी मुलांसाठी टाकाऊतून टिकावू अशी कार्यशाळा घेतली. संतोष पाठारे यांनी शॅार्ट फिल्म्स दाखवून त्यावर चर्चा घडवून आणली. प्रशांत केळकर व पंकज गुरव यांनी मुलांना नाटकाची माहिती देऊन त्यांची नाटके बसवली. गटचर्चेच्या माध्यमातून मुले त्यांना भिडणाऱ्या जात-धर्म- लिंगभेद तसेच आरक्षणाचा प्रश्न, आपला परिसर व पर्यावरण अशासारख्या अनेक विषयांवर मनमोकळी व्यक्त झाली. या शिबिराचा समारोप बुधवारी १९ एप्रिल रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले  8108949102 यांना संपर्क करावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading