सदनिका ‍निश्चितीची प्रक्रिया नि:पक्षपाती आणि पारदर्शी – महापौर

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आज शहरातील दिव्यांग व्यक्तींना पात्रतेनुसार लॉटरी पध्दतीने सदनिकांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणतेही राजकारण न करता अत्यंत पारदर्शकपणे महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन 190 जणांना सदनिकांची निश्चिती करण्यात आली. बीएसयूपी योजनेतंर्गत प्राप्त झालेल्या सदनिका दिव्यांगांना कायमस्वरुपी मालकी हक्काने देणारी ठाणे ही भारतातील पहिली महापालिका असल्याचे वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी येथे केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र 190 दिव्यांग व्यक्तींना लॉटरी पध्दतीने त्यांच्याच उपस्थितीत त्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून सदनिकांची निश्चिती करण्यात आली. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, विरोधकांना जर विरोध करायचा असेल तर त्यामध्ये तथ्य असेल तर जरुर विरोध करावा असे आव्हान महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी दिले. दिव्यांगाच्या विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून यामध्ये सायकल पुरविणे, प्रशिक्षण देणे आदी उपक्रम समाज विकास विभागाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येते यामध्ये महत्वाकांक्षी असा निर्णय महापालिकेने घेवून दिव्यांगाना कायमस्वरुपी दिलासा दिला आहे. यापूर्वी महापालिकेने दिव्यांगाच्या विकासासाठी स्टॉलचे वाटप, सायकल वाटप, स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले आहेत. महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाचं इतर महापालिकांनी अनुकरण केले आहे याचा सार्थ अभिमान असून समाज विकास आणि महिला बालकल्याण विभागातर्फे योजनांची नुसती घोषणा न करता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते असेही महापौरांनी यावेळी नमूद केले. तसेच आज जी घरे दिव्यांगाना लॉटरी पध्दतीने मिळणार आहेत त्याचा स्विकार करावा, याची यादी लगेच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल जेणेकरुन यामध्ये संशय निर्माण होणार नाही. समाज विकास आणि स्थावर मालमत्ता विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांनी कमी कालावधीत काम केल्याबद्दल त्यांचे महापौरांनी अभिनंदन केले. आज एकूण 190 दिव्यांग व्यक्तींना घरे मिळाली असली तरी जसजशा घरे उपलब्ध होतील तसे इतर पात्र दिव्यांगांना देखील टप्याटप्याने घरे दिली जातील यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. महापालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली, तुळशीधाम, पडले गाव, ब्रह्मांड कोलशेत, रिव्हरवूड सागली आदि विविध ठिकाणी मालकी हक्काच्या सदनिका मिळाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या कुटूंबाना मोठा दिलासा आणि कायम स्वरुपी आधार मिळाला असून याबाबत त्यांनी महापौरांचे आणि महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading