सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दिडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड

ठाणे महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील नवनवीन घोटा‌ळ्यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चौकशी सुरु केली असतानाच या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दिडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी केला आहे. या प्रकल्पांच्या खर्चाचा आकडा फुगविणाऱ्या पालिका प्रशासनाने त्यामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या वॅट आणि सेवा कराचा कोणताही विचार केला नसून या कराची रक्कम दिडशे कोटींच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मोठे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून ५०० कोटी, राज्य शासनाकडून २५० कोटी आणि महापालिकेकडून २५० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. यामध्ये खाडीकिनारा सुशोभीकरण प्रकल्प, कोपरी येथील सॅटीस पूल, गावदेवी मैदान येथे वाहनतळ तयार करणे अशा काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाला असून याप्रकरणी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चौकशी सुरु केली आहे. असे असतानाच या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दिडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला असल्याचा आरोप पतकी यांनी केला आहे. सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च एक हजार कोटी रुपयांच्या आसपास असून त्यावर अंदाजे १५ टक्के याप्रमाणे दिडशे कोटी रुपयांचा कर पालिकेला ठाणेकरांच्या कररुपी पैशातून भरावा लागणार आहे. शिवसेनेच्या नियोजन शुन्य कारभारामुळेच ठाणेकरांना हा आर्थिक भुर्दंड बसला आहे असा आरोपही सुजय पतकी यांनी केला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading