संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपी तैनात करण्याची मनोहर डुंबरे यांची मागणी

ठाण्यात लॉकडाऊन केवळ सरकारी आदेशावरच राहिला असून, कोणीही कधीही आणि कोठेही जात आहे. त्यामुळे मुंब्रा आणि वागळे इस्टेटप्रमाणेच संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपीच्या तुकड्या तैनात कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली आहे. पालिका क्षेत्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. सुरुवातीपासून हॉटस्पॉट ठरलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकर नगर आणि मुंब्रा क्षेत्रातून नागरिकांची शहराच्या विविध भागात ये-जा सुरू होती. त्याचा फटका संपूर्ण ठाणे शहराला बसला आहे. त्यामुळे राज्यात मुंबईपाठोपाठ ठाणे शहराचा क्रमांक आला आहे. लॉकडाऊन-४ च्या अखेरच्या टप्प्यातही शहरातील कोरोना नियंत्रणात येत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटले आहे. वागळे आणि मुंब्र्याप्रमाणेच संपूर्ण महापालिका हद्दीत आरएएफ किंवा एसआरपीच्या तुकड्या केल्यास बेशिस्त नागरिकांवर जरब बसू शकेल. त्यामुळे लवकरात लवकर शहरात तुकड्यांची नियुक्ती करावी अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading