श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर भाविकांना अनुभवयास मिळणार

ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेदुर्गेश्वरीचा दरबार प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धर्मवीर आनंद दिघेंनी जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या या नवरात्रौत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर्षी श्रीराम मंदिर लोर्कापण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारीत हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळया, ऑईल पेंट आदि सामुग्रीचा प्रामुख्याने यामध्ये वापर करण्यात येणार आहे. मंदिराची आरास सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाटे साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभीनाका ठाणे अशा सहा ठिकाणी काम सुरु असून, अंदाजे 350 कुशल तर अनेक अकुशल कामगार अहोरात्र काम करत आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा 40 x 40 फुट इतक्या मोजमापाचा असून, त्याची उंची 60 फुट आहे. छताचा आतील भाग नक्षीकामाने नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठूमाऊली आणि श्री सत्यनारायणाचे भाविकांना दर्शन होणार आहे. सभा मंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्प कलेची ओळख पटवून देणारी असेल असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. बाहेरील बाजूस 6 फुटी उंचीचे दोन गरुड स्वागतासाठी उभे असतील तर सात छोटे-मोठे कळस आणि एक मुख्य कळस उभारण्यात येणार असून भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम करत 101 फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न करतील. बाहेरील रोडवरील मुख्य कमानी वानरसेनेचे दर्शन घडविणारे असल्यामुळे आपण श्रीरामांच्या नगरीत असल्याची अनुभूती भाविकांनी निश्चितच होईल असेही खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धर्मवीर आनंद दिघेंनी सुरु केलेली नवरात्रौत्सवाची परंपरा अव्याहत चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक हिरीरीने काम करीत आहेत. सर्वांनी या नवरात्रौत्सवात सहभागी होवून या उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन जय अंबे मॉ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading