श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात

अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावरील कला महोत्सवांमध्ये गणना होत असलेला अंबरनाथ येथील श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात रंगणार असून दोन भव्य रंगमंचांवर संगीत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तिचे सात कलावंत आपली कला सादर करणार आहेत. यंदा पहिल्यांदाच सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमांसोबतच सकाळच्या सत्रातही सांगितीक मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या चार दिवसांच्या महोत्सवात भव्य कला दालनांमध्ये जुन्या-नव्या चित्रकारांच्या कलाकृतींचे तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल. अनेक प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असणारा खाद्य महोत्सव ही खवैय्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कला कुंभमेळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. यंदा तीनऐवजी चार दिवस हा फेस्टिव्हल रंगणार आहे. यंदा इंद्रधनुष्याप्रमाणे संगीत क्षेत्रातील सात प्रसिद्ध कलावंत चार दिवसात शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. या चारही दिवशी मुख्य रंगमंचावर संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर यंदा पहिल्यांदाच शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये संगीत पहाटही अनुभवता येणार आहे. शनिवार १८ मार्च आणि रविवार १९ मार्च रोजी मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या रंगमंचावर सकाळी सात वाजता खास संगीत मैफली आयोजित करण्यात आल्या आहेत. चार दिवसांच्या या सप्तरंगी संगीत महोत्सवात राकेश चौरसिया, पंकज उधास, अमित त्रिवेदी, अनुराधा पौडवाल, मोहित चौहान, मैथिली ठाकुर आणि शंकर महादेवन हे सात लोकप्रिय कलावंत त्यांच्या लोकप्रिय रचना सादर करणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading