नविन कळवा पुलाच्या सर्व मार्गीका वाहतुकीसाठी खुल्या

नविन कळवा पुलाची साकेतकडील पाचवी मार्गिका खुली करण्यात आली आहे. यामुळे साकेतकडून कळवा-खारीगांव आणि नवीमुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सोईचे झाले असून वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगीतले. महापालिका कार्यक्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कळवा खाडीवरील जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून नवीन पुलाची उभारणी महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. या नव्या पुलावरील तीन मार्गिका नोव्हेंबर 2022 मध्ये वाहतुकीकरिता खुल्या करण्यात आल्या. तर चौथी मार्गिका डिसेंबरमध्ये खुली करण्यात आली. आता पाचवी मार्गीकाही खुली झाल्यामुळे त्याचा फायदा वाहन चालकांना होणार आहे. शहरातून कळवा मुंब्या्रकडे जाणारी वाहतूक ही संपूर्णत: नवीन पुलावरुन करणे शक्य होईल. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. कळवा पुलाच्या एकूण पाच मार्गिका असून यामध्ये ठाणे शहराकडून कळवा, खारीगांव, मुंब्रा तसेच नवीमुंबईकडे जाण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय आणि ठाणे कारागृहामागील या दोन मार्गिका यापूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या केल्या आहेत. त्यामुळे कळवा चौक, ठाणे कारागृहासमोर होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे कमी झालेली आहे. तसेच या पुलाची तिसरी मार्गिका कळवा चौकात उतरत असून चौथी मार्गिका ठाणे- बेलापूर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरविण्यात आलेली आहे. पाचवी मार्गिका साकेत रस्त्याकडून कळवा, नवीमुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त असून सदर मार्गिका वर्तुळाकार पध्दतीने तयार करण्यात आलेली आहे. सदर नवीन कळवा पुलाची एकूण लांबी 2.40 किलोमीटर असून पुलावरील मार्गिकांची सरासरी रुंदी 8.50 मीटर इतकी आहे. सदर पुलाच्या सर्व मार्गिका वाहतुकीस उपलब्ध झाल्यामुळे आता पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading