शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेदरम्यान क्रीडा संकुलात मोठी गर्दी झाली होती. दरवर्षी शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. शिवसेना प्रमुख जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार होते. त्यांची कला नव्या पिढीला माहिती व्हावी या हेतूनं या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. या स्पर्धेला मिळणारा विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद पाहून टीएमटीच्या बसेसही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. व्यंगचित्रकार योगेश पंडीत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या स्पर्धेसाठी आशीर्वाद आहे या आशयाचं चित्र साकारलं होतं. या चित्राचं अनावरण करून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन गटात ही स्पर्धा झाली. मी आणि माझी आजी-आजोबा, नाना-नानी, आम्ही किल्ले बनवतो, माझ्या स्वप्नातील ठाणे, माझ्या परिसरातील उद्यान, आम्ही समुद्रकिनारी फिरायला जातो. माझा परिवहन बसमधील प्रवास, ठाण्यातील ऐतिहासिक वास्तू, मेट्रो प्रकल्प, महाराष्ट्रातील गड-किल्ले, मोबाईलचे दुष्परिणाम, महिलांचे स्वसंरक्षण काळाची गरज असे विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वत: विद्यार्थ्यांसोबत बसून चित्र रेखाटले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading