शिवनेरी बसच्या तिकिट दरात भरघोस कपात

राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटीनं दादर-पुणे आणि औरंगाबादच्या तिकिट दरात भरघोस कपात केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली असून येत्या सोमवारपासून ही कपात लागू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी ही सेवा किफायतशीर, सुरक्षित आणि आरामदायी आहे. राज्यातील ७ वेगवेगळ्या मार्गांवर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फे-या होतात. प्रवाशांची संख्या आणखी वाढावी या उद्देशानं ही तिकिट दर कपात करण्यात आल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणा-या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळं शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकिट दर कमी केल्यामुळं हे प्रवासी सुध्दा शिवनेरीकडे वळतील अशी अपेक्षा आहे. दादर-पुणे या मार्गाचे तिकिट पूर्वीच्या ५२० वरून ४४० करण्यात आलं आहे. दादर-स्वारगेट हे पूर्वीच्या ५४० वरून ४६० करण्यात आलं आहे. बोरिवली-स्वारगेट या मार्गाचे पूर्वीचे तिकिट ६१५ रूपये तिकिट आता ५२५ रूपये करण्यात आलं आहे. पुणे-औरंगाबाद या मार्गाचं पूर्वीचं ७७५ रूपये तिकिट आता ६५५ रूपये करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading