बेस्ट प्रमाणेच ठाणे परिवहन सेवेलाही १०० कोटी रूपयांचं अनुदान देण्याची नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मागणी

मुंबईतील बेस्ट प्रमाणेच ठाणे महापालिका परिवहन सेवेला संजीवनी देण्यासाठी महापालिकेनं अतिरिक्त १०० कोटींचं अनुदान तातडीनं द्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेनं बेस्टला पहिल्या टप्प्यात २०० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानामुळं बेस्ट प्रशासनानं साध्या बससाठी पहिल्या ५ किलोमीटरकरिता किमान भाडे ५ रूपये तर वातानुकुलित बससाठी ६ रूपये भाडे निश्चित केलं आहे. तसंच जादा बसेसही भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. यामुळं बेस्ट उपक्रम फायद्यात येण्याची अपेक्षा आहे. मुंबई प्रमाणेच ठाण्यातही खाजगी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या कामामुळे तीन हात नाका ते कासारवडवली पर्यंत वाहतूक कोंडी नेहमीच असते. बेस्ट पॅटर्न प्रमाणे बसभाडं कमी केल्यास प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन खाजगी वाहनांची संख्या घटण्याची अपेक्षा आहे. तोच पॅटर्न परिवहन सेवेत राबवण्यासाठी १०० कोटींची तरतूद करावी अशी मागणी मनोहर डुंबरे यांनी केली आहे. शहरामध्ये बेस्ट कडूनही सेवा दिली जाते. ठाणे-बोरिवली मार्गावर मोठ्या संख्येनं बेस्ट बसेस धावत आहेत. त्यामुळं बेस्टच्या कमी दरामुळे प्रवासी बेस्टकडे वळल्यास त्याचा मोठा आर्थिक फटका परिवहन सेवेला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रमाणेच परिवहन सेवेचे किमान भाडे ५ रूपये निश्चित करण्याची मागणीही मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading