शासकीय निर्बंधांमुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत निरूत्साहात

सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचं स्वागत नेहमी जल्लोषात केलं जातं. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचं स्वागत फारसं उत्साहानं झाल्याचं दिसलं नाही. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं अनेक निर्बंध नववर्ष कार्यक्रमावर लावण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रात्री ११ नंतर संचारबंदी लावण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत ११ नंतर रस्त्यावर न येण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात होतं त्यामुळं काल नववर्षाचं स्वागत म्हणावं तसं झालं नाही. रात्री ११ च्या सुमारास तर प्रत्येकाची घरी पोहचण्याची घाई दिसत होती. उपवन, मासुंदा तलाव अशा ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी तरूणांचा सागर लोटल्याचं चित्र नेहमी पहायला मिळतं. मात्र काल अशा ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त सर्वत्र होता. अगदी संध्याकाळी ७ वाजल्यापासूनच नाक्यानाक्यांवर पोलीस दिसत होते. महत्वाच्या काही चौकांमध्ये तर पीपीई कीट घालून वाहतूक नियमन करताना पोलीस दिसत होते. तळीरामांवर तर २५ डिसेंबरपासूनच कारवाई सुरू झाली होती. सरत्या वर्षाच्या आदल्या दिवशी गृहमंत्र्यांनी संचारबंदीमध्ये एकत्र जमू नये असं आवाहन केलं होतं. मात्र पार्टी करू शकता, मित्रांच्या घरी जाऊ शकता फक्त नियम पाळण्याचं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं होतं. दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रतिकात्मक पुतळे तयार केले जातात मात्र असे पुतळेही कुठे दिसले नाहीत. बहुतांश मंडळींनी घरातील दूरचित्रवाणी संचावर नववर्षाच्या कार्यक्रमांचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. नववर्षाच्या स्वागतासाठी अगदी तुरळक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होताना पहायला मिळाली. यंदा वर्षअखेर ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारी आल्यामुळं अनेकांना सामिष पार्ट्यांना फाटा द्यावा लागला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading