शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. स्वच्छता आणि सौंदर्यीकरण याबाबत शहराने कात टाकली असून ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत स्वच्छ शौचालय अभियान देखील हाती घेण्यात आले आहे. या अभियानातंर्गत शहरातील 821 सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती, नुतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून 15 जुलैपर्यंत शौचालयांची सर्व कामे दृश्य स्वरुपात नागरिकांना  दिसली पाहिजेत अशा पध्दतीने कामे पूर्ण  करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना आज झालेल्या बैठकीत दिले.
महापालिका क्षेत्रातील 50 टक्क्‌यांपेक्षा जास्त लोकसंख्या  झोपडपट्टीमध्ये राहते. येथे राहणाऱ्या बहुतांश नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे अपरिहार्य असल्याने शौचालयांची भौतिक स्थिती चांगली असणे आणि त्यांची स्वच्छता अत्युच्च दर्जाची असणे हे महापालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे. झोपडपट्टीतील सर्व शौचालय सुस्थितीत आणि आवश्यक सेवासुविधांनी युक्त असली पाहिजेत, कुठल्याही नागरिकाला असुविधेचा सामना करावा लागणार नाही या दृष्टीकोनातून अस्तित्वातील शौचालयाचे नुतनीकरण तसंच नव्याने बांधण्यात येणाऱ्या शौचालयाची कामे दर्जेदार पध्दतीने होतील यासाठी सर्व अभियंत्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच याकामी नियुक्त केलेल्या ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून नियोजित काम होते आहे की नाही यासाठी सातत्याने पाहणी करावी आणि या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करुन घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. जर या कामात उणीवा आढळून आल्या, काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाचे मोजमाप करुन जर बिलासाठी सादर केल्याचे निदर्शनास आले तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी या बैठकीत दिला. स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण 98 कोटी  निधी उपलब्ध करुन दिला आहे. एकूण 821 शौचालयांच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव असून या कामाचे कार्यादेश निर्गमित करण्यात आले आहेत. शौचालये ही नागरिकांना वापरण्यास योग्य राहतील तसेच महिलांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व शौचालये कायमस्वरुपी स्वच्छ नीटनेटके राहतील अशा प्रकारे दैनंदिन निगा, देखभाल राखण्यात यावी. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत वॉटरप्लस मानांकन स्पर्धेत महापालिका सहभागी होत आहे. ठाणे शहराला वॉटरप्लस मानांकन प्राप्त होण्यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी  पाण्याच्या उपलब्धतेसाठी शौचालयांवर ओव्हरहेड टँक बसविणे, शौचालयात नळ असणे, कडी कोयंडे सुस्थितीत असणे, शौचालयात पुरेशा प्रमाणात उजेड तसेच विजेची व्यवस्था असणे, दिव्यांगांना वापरण्यायोग्य अशी शौचालयांची रचना आदी बाबी असणे आवश्यक आहे. तसेच शौचालयात विदारक परिस्थती आढळून आल्यास किंवा याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कारवाई  करण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आल्या.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading