वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरामध्ये ६ लाख वृक्षांची लागवड करून राज्यात एक वेगळा आदर्श

ठाणे महापालिकेनं वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरामध्ये ६ लाख वृक्षांची लागवड करून राज्यात एक वेगळा आदर्श घालून दिल्याचं सांगत महापालिकेचे वृक्षवल्ली हे प्रदर्शन देशभरात पहिल्या क्रमांकाचे प्रदर्शन म्हणून गौरवलं जाईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ११व्या वृक्षवल्ली २०१९ या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नागरी क्षेत्रात झाडांचं जतन व्हावं, नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी आणि यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं महापालिकेतर्फे या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. यावेळी रेमंड सर्कल पासून रेमंड मैदानापर्यंत वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात झाडं, फुलं, फळं आणि भाजीपाला यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनात ४० स्टॉल धारकांसह १०० वैयक्तीक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनामध्ये लोकांना आपल्या आवडीची फुलं, फळं, झाडं, शोभेच्या वनस्पती, उद्यानाशी संबंधित अवजारे खरेदी करता येणार आहेत. उद्यापर्यंत हे प्रदर्शन ९ ते ९ या वेळेत खुले असून ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading