वुई टुगेदर या सामाजिक संस्थेच्या धान्य बँक उपक्रमास ठाणेकरांनी मदत करण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन

वंचितांच्या मुखी घास भरवणा-या वुई टुगेदर या सामाजिक संस्थेच्या धान्य बँक या अनोख्या उपक्रमास ठाणेकरांनी मदत करण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. शहरामध्ये गरजू, वंचित कुटुंबांना मदतीचा हात म्हणून गेली ३ वर्ष सातत्यानं वुई टुगेदर या सामाजिक संस्थेच्या धान्य बँकेमार्फत अन्नधान्य पुरवले जात आहे. राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आधाराश्रम, बालिकाश्रम, वृध्दाश्रम तसंच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर धान्याची गरज असते. या संस्थांना मदत करण्याच्या हेतूनं उज्ज्वला बागवाडे यांनी अनेक गृहिणींना एकत्र घेऊन धान्य बँक सुरू केली आहे. वुई टुगेदर मार्फत या सर्व संस्थांना धान्य बँकेतील धान्य देण्याचं काम सुरू आहे. धान्य बँक या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं महापालिका आयुक्तांनी कौतुक करून धान्य बँकेस मदत करण्याचं आवाहन केलं. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, मुंबई अशा विविध ठिकाणी सध्या धान्य बँकेचं काम सुरू आहे. या बँकेस ११०० लोक धान्य दान करत असून ९० गृहिणी या बँकेचं काम सांभाळत आहेत. धान्य बँकेनं अनेक संस्थांना दत्तक घेतलं आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पेण जिल्ह्यातील ११ संस्थांना ही बँक धान्य पुरवत आहे. आत्तापर्यंत ३० हजार किलो पेक्षा जास्त धान्य सामाजिक संस्थांना देऊन अनेक वंचितांच्या मुखी घास भरवला आहे. दरमहा ६० रूपये यानुसार वर्षाचे ७०० अथवा महिना १०० रूपयांप्रमाणे वर्षाचे १२०० रूपये जमा करून आपणही या धान्य बँकेस मदत करू शकता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading