वीज बील दरवाढी विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे याचिका दाखल

लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायकारक वीज बिल दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमैय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य सरकार आणि महावितरणविरोधात तक्रार करून दरवाढ तातडीने रद्द करून लॉकडाऊनच्या काळात १०० युनिटपर्यंतची वीज विनामूल्य देण्याची मागणी केली आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या भरमसाठ वीज बिलांकडे याचिकेद्वारे आयोगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. सामान्य माणसाला ही भरमसाठ वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे महावितरणने दरवाढ तातडीने रद्द करावी, वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज विनामूल्य द्यावी आदी मागण्या याचिकेद्वारे आयोगापुढे करण्यात आल्या आहेत. अवाजवी वीज बिलांची फेरतपासणी करावी, बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यास स्थगिती द्यावी, १०० युनिटपर्यंत विनामूल्य वीज आणि ३०० युनिटपर्यंत वीजवापर झालेल्या कुटुंबांना ५० टक्के सवलतीच्या दराने वीज द्यावी, २५ टक्क्यांहून जास्त विजेचा वापर झालेल्या वीजबिलांच्या वसुलीलाही स्थगिती द्यावी आदी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील हजारो नागरिकांना जादा वीजबिले पाठविण्यात आली आहेत. या बिलांची छायाचित्रे आणि आपली तक्रार धनंजय थिटे यांच्या ९९२०७८१६२६ या व्हॉट्स अँप क्रमांकावर पाठवावी. ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कंपनीकडे पोचवून न्याय मिळवून दिला जाईल असं आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading