विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाची असून कूर्मगतीने सुरू – आमदार संजय केळकर

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाण्यात सुरू असलेल्या विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाची असून कूर्मगतीने सुरू आहेत. दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गणेश विसर्जन घाटांची कामे शहरात सुरू आहेत. आमदार संजय केळकर यांनी साकेत-बाळकुम, कशेळी आणि कोलशेत या विसर्जन घाटांची पाहणी केली. यावेळी अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पाहणी केल्यानंतर .केळकर म्हणाले, विसर्जन घाट केवळ गणपती विसर्जनासाठी नसून त्याचा वापर वर्षभर विविध कार्यक्रम आणि सणांसाठी होतो. त्यामुळे या घाटांचे बांधकाम उच्च दर्जाचे आणि सुविधांनी युक्त असायला हवे. या विकासकामांसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. साधारणपणे ठेकेदारांना १८ महिन्यांचा कालावधी देण्यात येतो, मात्र या घाटांची कामे निकृष्ट दर्जाची असून ती कूर्मगतीने सुरू असल्याचे केळकर म्हणाले. याबाबत आयुक्तांशी बोलून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य सरकारने ६०५ कोटींचा निधी दिला. ही कामे झाल्यानंतर त्याचे थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय ठेकेदारांना बिले अदा करू नयेत, असे निर्देश आहेत. मात्र ऑडिटशिवाय बिले अदा केल्याचे आढळून येत आहे. या प्रकरणी आयुक्तांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केळकर यांनी केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading