विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ हजार ९२ प्रवाश्यां कडून ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांवर मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीमुळे एकाच दिवसात तब्बल ३ हजार ९२ विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणारे आढळुन आले. या सर्वावर केलेल्या दंडात्मक कारवाईत एकुण ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे तिकीट तपासणीस रेल्वे स्थानक तसेच, धावत्या गाडीत तिकीट तपासणी करीत असतात. मुंबई विभागातर्फे ठाणे रेल्वे स्थानकावर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अरुण कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक डग्लस मिनेझेस यांच्या नेतृत्वाखाली १२० तिकीट तपासणी कर्मचारी आणि ३० आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पथकाने तिकीट तपासणी मोहीम राबवली. या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान, विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणारे ३०९२ प्रवाशी आढळून आले. या सर्व प्रकरणांत दंड आकारण्यात आला. त्यानुसार एका दिवसात ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, प्रवाशांनी गैरसोय तसेच कारवाई टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केल आहे. रेल्वे स्थानकावर विनातिकीट प्रवासी आढळल्यास रेल्वे तिकीट तपासणीस त्यांना रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करतात. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भुसावळ, मनमाड, खांडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले आहेत. रेल्वे दंडाधिकारी सुनावणीअंती प्रवाशांना दंड करीत असतात. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात धावत्या गाड्यांमध्ये तपासणी केली जाते आणि स्थानकांवर न्यायालये भरवली जातात. तिकीट तपासणी महसुलात मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३०३.३७ कोटी रुपये मिळाले आहेत. रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला २३५.५० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. तिकीट तपासणी मोहिमेत ठाणे स्थानकात हा सर्वाधिक महसूल वसुल केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading