विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे. स्वायत्त महाविद्यालय म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मान्यता दिली जाते. गेल्या डिसेंबरमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका समितीनं या मान्यतेसाठी महाविद्यालयाला भेट दिली होती. शैक्षणिक आणि इतर बाबींची तपासणी करून विद्यापीठ आयोगानं काल विज्ञान महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालय म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळं बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्यावर्षीच महाविद्यालयानं आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. महाविद्यालयात सुरूवातीला ५ विषयात पदवी शिक्षणाची सुरूवात झाली. आता पदवी स्तरावर एकूण १३ विषय शिकवले जातात. या व्यतिरिक्त रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, पर्यावरण शास्त्र, जैव विविधता, वन्य जीव संवर्धन आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची तर रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र आणि पर्यावरण शास्त्र या विषयांमध्ये संशोधनाची आणि पीएचडीची सोय आहे. महाविद्यालयातील १० शिक्षकांना संशोधनाकरता मार्गदर्शक म्हणून विद्यापीठानं मान्यता दिली आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असताना दुसरीकडे क्वारंटाईन सेंटरसाठी महाविद्यालय अधिगृहित करण्याचा पराक्रम महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. शैक्षणिक बाबींमध्ये प्रोत्साहन देण्याऐवजी राजकारणातून विद्यार्थ्यांचा विकास रखडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. ठाण्यामध्ये स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता मिळवणारं बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय हे बहुधा पहिलंच महाविद्यालय असावं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading