लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता

ठाण्यामध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या रविवारी संपत असून परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार केला जाईल असं सूतोवाच महापालिका आयुक्तांनी केलं असलं तरी लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसत आहे. ठाणे महापालिकेनं गेल्या आठवड्यात येत्या रविवारपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. या सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघंही कंटाळले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचेही खाण्याचे हाल होत आहेत. कोरोनावर नियंत्रण यावं म्हणून लॉकडाऊन वाढवल्याचं कारण देण्यात आलं. मात्र रूग्णांच्या संख्येत कुठेच घट नसून रोज ३०० च्या वर रूग्ण सापडत आहेत. लॉकडाऊन करण्यापेक्षा लॉकडाऊन न करता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षानं लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी तर ठाणेकरांना लॉकडाऊन नको म्हणून पालिकेला कळवण्याचं आवाहनही केलं आहे. व्यापारी वर्गानंही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मीरा-भाईंदरमध्ये बोलताना लॉकडाऊन वाढवण्यास विरोध दर्शवला आहे. इतके दिवस लॉकडाऊनच्या विरोधात ब्र उमटत नव्हता. पण आता अति झाल्यामुळे विरोधाचा सूर उमटू लागला आहे. त्यातच पुढील आठवड्यापासून सण-उत्सवांची सुरूवात होत असल्यामुळं लॉकडाऊन वाढवल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading