विकास गजरे पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द

विकास गजरे यांनी गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” या जागतिक पातळीवरील स्पर्धेतही दैदिप्यमान कामगिरी करीत स्वत:ला पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द केले आहे.नुकताच कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष Triathlon या स्पर्धेत “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” बनण्याचा पराक्रम केला होता. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी असलेले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2007 ची सरळसेवा परीक्षा देवून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले विकास गजरे हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. या यशाबददल त्यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, इतर शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे. गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 देशातील विविध ठिकाणाहून एकूण 787 स्पर्धक सहभागी झाले हाते. जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत समुद्रात 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकल चालविणे आणि 21.1 किमी धावणे या बाबींचा समावेश होता. स्पर्धकांसमोर 112.9 किमी अंतराची ही स्पर्धा 8 तास आणि 30 मिनिटात पूर्ण करण्याचे आव्हान होते. स्पर्धेचा प्रारंभ मिरामार येथे झाला होता. यापैकी 517 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. जवळपास 34% स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करु शकले नाहीत. मात्र अशा या जगातील अत्यंत अवघड असलेली, आव्हानात्मक, शरीर आणि मनाच्या ताकदीची कसोटी पाहणारी “आयर्न मॅन ट्रायथलॉन” स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी अवघ्या 8 तास 8 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. गजरे यांनी या स्पर्धेत वयानुसार असलेल्या गटातून 88 वा तर पुरुष गटातून 468 वा क्रमांक पटकाविला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading