‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन

आदिवासी संस्कृती आणि त्यांचे निसर्गाशी असलेले अतुट नाते लक्षात घेऊन ‘बाईमाणूस’ आणि ‘असर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट धरित्री’ हे अभियान सुरू करण्यात आले असून याच अभियानाच्या अंतर्गत ‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन’ हा उपक्रम नुकताच डहाणू येथे पार पडला. निसर्गाकडून माणसाला मुक्तहस्ते प्राणवायू, पाणी, फळे, लाकूड इ. जीवनावश्यक घटक मिळतात. परंतु माणसाला याची जाणीव राहिलेली नाही आणि त्याने निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. तो बेसुमार जंगलतोड करीतआहे. जंगलातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर आक्रमण करीत आहे. नद्यांचे पाणी विषारी करीत आहे. त्यामुळे जलसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय तो भूगर्भाच्या पोटातील पाण्याचा बेसुमार उपसाही करीत आहे. त्यामुळे पाण्याची वानवा निर्माण झाली आहे. थोडक्यात माणूस पर्यावरणाचा ऱ्हास करीत आहे. परंतू दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजाइतके पर्यावरण भान इतरत्र कुठे आढळत नाही. आदिवासी संस्कृतीचे सामुहिक जीवन जंगलाशिवाय पूर्ण होत नाही. आदिवासींच्या प्रत्येक प्रथा परंपरा जंगलाशी निगडीत असतात. जंगल हे त्यांच्या उपजीविकेचे साधन असले तरीही जंगलातील संसाधने मिळेल तशी ओरबाडणे, त्यांचा अपव्यय करणे, लोभासाठी ती नष्ट करणे ही वृत्ती आदिवासींमध्ये दिसून येत नाही. जल जंगल जमीन टिकली तर आपली संस्कृती टिकेल तरच आपण टिकू या भावनेतून जल जंगल जमिनीचे संवर्धन करण्याचे नियम आदिवासींच्या संस्कृतीमध्ये प्रथा परंपरामध्ये गुंफलेले आढळतात. वारली चित्रकला. ही कला वारली समाजाच्या संस्कृतीचा आरसा आहे. महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातीतील पूरातन वारली चित्रकलेला आजच्या काळातही मोठ्याप्रमाणात पसंत केले जाते. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, पालघर, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागांमध्ये वारली चित्रकला आढळते. ‘प्रोजेक्ट धरित्री’ या उपक्रमाअंतर्गत हवामान बदलाचा महिलांवर आणि तळागाळातील समाजावर होणार परिणाम, त्याची कारणे आणि त्यासंदर्भात करावयाची असणारी उपाययोजना याविषयी ‘बाईमाणूस’ने त्यांच्या स्थानिक प्रतिनिधीमार्फत जनजागृती अभियान अंतर्गत कामे केली आहेत. डहाणू-पालघर येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भिंतींवर ‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून डहाणू येथील पोंडा स्कूल येथे शाळेतील एका भिंतीवर पर्यावरण जनजागृती या विषयावर वारली चित्रकला साकारण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या भिंतीवर बाईमाणूसच्या प्रतिनिधी अश्विनी सुतार यांनी हवामान बदलांमुळे जनजीवनावर होणारे परिणाम वारली चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटले आहे. या पेंटिंगमध्ये त्यांनी पालघर विभागात गेल्या दशकभरापासून हवामान बदलांमुळे आरोग्य आणि शेतीचे झालेले नुकसान, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याविषयी भाष्य केले आहे. वारली चित्रकला ही वारली आदिवासी समुदायाची व्यक्त होण्याची भाषाच आहे आणि त्यामुळेच हवामान बदल विषयी येथील सामान्य लोकांपर्यंत संदेश पोहचविण्यासाठी अश्विनीने वारली चित्रकलेच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहे.
बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशन ही महाराष्ट्रातील दलित-भटके विमुक्त, आदिवासी, शेतकरी, ट्रान्सजेंडर आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला यांच्या विषयावर गावपातळीवरील महिलांना प्रतिनिधीत्व देऊन पत्रकारिता करणारी संस्था आहे. गेल्या २ वर्षांपासून संस्थेद्वारे दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि ग्रामीण भागातील महिला यांच्या समस्या, संस्कृती आणि जडणघडण या विषयांवर ग्राउंड रिपोर्ट, बातम्या आणि व्हिडिओ स्टोरी च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र्भर आवाज पोहचविण्याचे काम सुरु आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘बाईमाणूस’च्या पालघरच्या जिल्हा प्रतिनिधी पूनम चौरे यांनी ‘प्रोजेक्ट धरित्री’ या उपक्रमाबद्दल माहिती देतांना ‘जोहार’ या शब्दाचा निसर्गाशी असलेला संबंध उलगडून दाखवला. कार्यक्रमानंतर वारली पेंटिंग करण्यात आलेल्या भिंतीसमोर विभागातील वारली आदिवासी समाजातील महिलांनी पारंपारिक तारपा नृत्य करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading