विकासकामाअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांची कामे 60 ते 70 टक्के पूर्ण – महापालिका आयुक्त

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रभाग समितीनिहाय विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेली कामे 60 ते 70 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने युध्दपातळीवर काम करण्याचे निर्देश देत असतानाच रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वकच झाली पाहिजेत अशा सूचना त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत कार्यकारी अभियंतानिहाय कामनिहाय आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती, त्याची अपेक्षित काम पूर्ण होण्याची तारीख, काम पूर्णत्वाबाबत काही अडचणी असतील तर त्या कशा सोडविता येतील या बाबींची चर्चा करण्यात आली. यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांची बिले सादर झाली आहेत का? गुणवत्तापूर्वक कामे केली असतील तर देयके प्रलंबित राहणार नाही याबाबत दक्ष रहा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. रस्त्यांची कामे ही दर्जेदार पध्दतीने होतील यासाठी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी या कामावर नजर ठेवा. शहरातील जे मुख्य रस्त्यांना प्रथम प्राधान्य देवून ही कामे तातडीने पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे, सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सुरू असलेल्या कामांचा वेळोवेळी दर्जा तपासून संबंधित ठेकेदारास त्या प्रमाणे सूचना करुन गुणवत्तापूर्वक रस्ते तयार होतील यासाठी कटाक्ष ठेवावा. रस्त्यांची कामे करत असताना कलव्हर्ट, जॉईंट फिलींग, लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंगची कामे देखील एकमार्गी पूर्ण करावीत. ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहे, त्यामुळे बिले अदा झाली नाही ही सबब चालणार नाही तसेच नव्याने तयार झालेल्या रस्त्यांची कामे जर खराब झाली तर ती खपवून घेतली जाणार नाही असा सूचक इशाराही या बैठकीत बांगर यांनी दिला. सध्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे, याची जाणीव ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण कशी होतील यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करावेत अशा सूचनाही या बैठकीत दिल्या. कामे चालू असताना लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याकडून कामाबाबत जो फिडबॅक मिळतो, तो तपासून घ्यावा आणि त्यामध्ये काही कार्यवाही करण्यायोग्य मुद्दे आढळल्यास त्याची अंमलबजावणी व्हावी असेही आयुक्तांनी नमूद केले. ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून 605 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या 282 रस्त्यांची कामे प्रभागसमितीनिहाय सुरू आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा या बैठकीत आयुक्तांनी घेतला. ठाणे महापालिका हद्दीत 214 कोटी अंतर्गत 127 रस्त्यांची कामे सुरू आहेत तर 391 कोटीं अंतर्गत 155 रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्याची कामे करीत असताना रस्त्यावर पडलेले डेब्रीज तातडीने उचलले गेले पाहिजे. रस्त्याची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना दिसतील अशा पध्दतीने फलक लावा जेणेकरुन त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन घेण्यासाठी तिन्ही पाळ्यांमध्ये कामे सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरात विविध प्राधिकरणाची कामे सुरू आहेत. घोडबंदर रोडवर तसेच ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्या प्राधिकरणाशी चर्चा करुन कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने मार्ग काढावा. रस्त्यावर खड्डा पडलेला अजिबात खपवून घेणार नाही असेही त्यांनी नमूद केले. नागरिकांनी रस्त्यांच्या कामांबाबत तक्रार केली असल्यास त्याची तात्काळ दखल घेवून त्यावर उपाययोजना करा. तसेच ज्या ठिकाणी कामे पूर्ण करताना अडथळा निर्माण होत असेल किंवा स्थानिक नागरिक हस्तक्षेप करत असतील तर संबंधित विभागाच्या लोकप्रतिनिधी संपर्क साधून कामे करा अथवा पोलीस बंदोबस्तात काम करुन घ्या असे सांगितले. ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेली कामे दर्जेदार पध्दतीने करावीत जेणेकरुन तेथे केलेले बदल हे नागरिकांच्या दृश्यस्वरुपात नजरेस पडतील. कळवा नाका येथे सुरू असलेली कामे, आनंदनगर येथील दीपस्तंभ, चौकातील शिल्पांची कामे, विविध ठिकाणी सुरू असलेली उद्यानांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading