वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला – पोलीस उपायुक्तांकडून कौतुक

वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने कारला लागलेली आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. पोलीस उपायुक्तांकडून वाहतूक पोलीसांचा गौरव करण्यात आला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या पोलो कारने कापुरबावडीनजीकच्या गोल्डन क्राँस सर्कल जवळ अचानक पेट घेतला. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत एक रेडिमिक्स काँक्रिटची गाडी थांबवून त्यातल्या पाण्याने ही आग आटोक्यात आणली. गाडीतील मौल्यवान सामानही त्यामुळे सुरक्षित राहिले. वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-यांचा पाठ थोपटली आहे. काल सकाळी पुण्याहून ठाण्याच्या दिशेने येत होती. गोल्डन क्राँस परिसर ओलांडत असताना अचानक या गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे भेदरलेल्या सौरभ सिंग यांनी गाडी थांबवली. त्यानंतर सिंग दांम्पत्य तातडीने गाडी बाहेर पडले. दुस-या क्षणी या गाडीने अचानाक पेट घेतला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस हवालदार श्रीकांत वानखेडे, भोये आणि राठोड यांनी पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी समोरच्या रस्त्यावरून जाणारे बीटकाँन कंपनीचे रेडी मिक्स काँक्रिटचे वाहन थांबविले. काँक्रिट मिक्स करण्यासाठी वापरले जाणा-या पाण्याच्या सहाय्याने त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या गाडीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेली एक बँग होती होते. पूर्ण गाडीने पेट घेण्यापूर्वीच आग आटोक्यात आल्यामुळे मौल्यवान साहित्याची ती बँगही सुरक्षित राहिली. त्यानंतर पोलिसांनीच क्रेनच्या सहाय्याने ही गाडी गँरेजपर्यंत पोहोचवली. सिंग दांम्पत्याने मदतीस धावून आलेल्या पोलीस कर्मचा-यांचे आभार मानले. वाहतूक पोलिसांच्या कापूरबावडी उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. जी. लंभाते यांनीही वानखेडे, भोये आणि राठोड या पोलीस कर्मचा-यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात या पोलीस कर्मचा-यांचा गौरव करण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading