वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर कठोर कायद्याचा बडगा पोलिसांनी उगारावा – मकरंद अनासपुरे

वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर पुढील ११ महिने कठोर कायद्याचा बडगाही पोलिसांनी उगारावा. त्यासाठी कठोर कायदा अभियान राबवा, अशी विनंती वजा सूचना सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी केली. ठाणे वाहतूक पोलिसांच्यावतीने आयोजित केलेल्या सुपर बाईक रॅलीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलिस आयुक्त सुरेश मेखला, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री अनिता दाते, ठाणे वाहतूक पोलिसांचे ब्रँण्ड अँम्बेसेडर मंगेश देसाई, वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यावेळी अनासपूरे बोलत होते. वाहतुकीचे नियम प्रत्येकालाच माहित असतात. तसे फलकही ठिकठिकाणी लावले जातात. परंतु, त्यांचे पालन करण्याऐवजी ते तोडण्याचीच स्पर्धा लागलेली असते. या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रेमाने सुसंवाद साधण्याबरोबरच कठोर कायद्याचा बडगा उचलण्याची गरज मकरंद अनासपुरेंनी व्यक्त केली. आपल्या सुरक्षेची काळजी आणि अपघाताची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे येणार नाही. ही खबरदारी आपल्याच घ्यायची आहे. कोरोना संक्रमाणाच्या काळात आपण तोंडावर मास्क घालायला आणि सॅनिटायझर्स वापरायला शिकलो. तसेच, मोटारसायकल चालविताना कायम हेल्मेट घालायलाही शिका, असा सल्लाही अनासपूरे यांनी दिला. तर, प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे नियमांचे पालन केले तर वाहतूक पोलिसांना अशा जनजागृती मोहिमा राबवाव्या लागणार नाहीत. तो दिवस लवकरच येईल अशी आशा अभिजीत खांडकेकर यांनी व्यक्त केली. वाहनचालकांना सुपर बुद्धी मिळो कोरनाच्या रुपाने निसर्गाने मानव जातीला मोठी शिक्षा दिली. त्यानंतर आजही अनेकांना तोंडावरील मास्कचे वावडे का वाटते, हे मला कळत नाही. निसर्गाच्या एवढ्या मोठ्या शिक्षेनंतरही आपण जर धडा घेत नसू तर दोन – पाचशे रुपयांच्या दंडाचा आपल्यावर किती परिणाम होईल असाही प्रश्न पडतो. पंरतु, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुमच्याकडे जशी सुपर बाईक आहे तशी प्रत्येक वाहनचालकाला नियमपालनासाठी सुपरबुद्धी मिळावी, अशी सदिच्छा पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. हर्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया यांसारख्या जवळपास ३०० सुपर बाईक्स या संचलनात सहभागी झाल्या होत्या. ठाणे शहरांत सुमारे २० किलोमीटरचे संचलन या बाइकर्सनी केले. यावर्षी पहिल्यांदाच रॅलीच्या मार्गावर १० ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. बाईकर्सना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी लोटली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading