बील न भरणा-यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केल्यामुळं नागरिकांमध्ये संताप

लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने घुमजाव केल्यानंतर महावितरणने थकित वीजबल वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातही वीज खंडीत केल्याने नागरिकांमधे संताप व्यक्त होत आहे.आधीच शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यास आणि आता तर ऐन परिक्षेचा काळ असताना वीज कापल्याने हवालदिल झालेला पालकवर्ग महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या फसवेगीरीचा धिक्कार करीत आहे. कोरोना काळात नागरिकांना वाढीव बिले पाठविण्यात आली होती. एकिकडे उत्पन्न बंद झाले असताना महावितरणने वीज दरवाढ लादली. त्यानंतर सरकारने दिलासा देण्याचे सांगुन घुमजाव केले. तर आता महावितरणने अन्यायकारक पद्धतीने वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा पाठविल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मध्यंतरी,आघाडी सरकारच्या या धोरणाचा निषेध करीत भाजपने वीज बीलांची होळी करण्याबरोबरच महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही प्रयत्न केला.तर,मनसेनेही यावरून वारंवार आंदोलन छेडुन फसवणाऱ्या उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.मनसेप्रमुखांनी तर,अदानी आणि शरद पवारांच्या भेटीचा उल्लेख करून त्याबाबत संशय व्यक्त केला. तरीही सरकार वसुलीवर ठाम आहे. ठाणे महापालिका हद्दीतील हजारो रहिवाशांना नोटीसा पाठविण्यात आल्या असुन थकित वीजबिल न देणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी कापण्याचा धडाका महावितरणने सुरु केला आहे.आधीच कोरोनामुळे आमदनी घटली.अनेकांचे रोजगार बुडाले मात्र,ठाकरे सरकारने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ चे पालुपद लावुन या कालावधीत कोणतेही पॅकेज दिले नाही.त्यामुळे, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत असुन राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारविरोधात जनतेमध्ये आक्रोश सुरू आहे. या संदर्भात ठाणे मंडलातील महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आम्ही सरकारच्या आदेशाचे पालन करीत असुन त्यानुसार,लॉकडाऊन काळापासुन ज्यांनी बिलेच भरली नाहीत.अशा ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत आवाहन करीत असल्याचे सांगितले.त्यानंतरही वीज बिले अदा केली नाही तर वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading