वाचक चळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या शैलजा बेडेकर यांच्या मनोरंजन या वाचनालयाला ५० वर्ष पूर्ण

शारीरिक अपंगत्त्वावर मात करून शहराच्या वाचक चळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या शैलजा बेडेकर यांच्या मनोरंजन या वाचनालयाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. जन्मत:च अपंगत्व असूनही शैलजा बेडेकर यांनी संस्कृत आणि मराठी विषय घेऊन एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर गेले पाच दशके सातत्याने त्या ग्रंथालय व्यवस्थापनाचे काम करीत आहेत. १९४५ च्या दिवाळीत जन्मलेल्या शैलजा बेडेकर यांचीही यंदा पंच्याहत्तरी असून या दुहेरी योगानिमित्त ‘मनोरंजन’च्या वाटचालीचा आढावा घेण्याचा मनोदय बेडेकर कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. शैलजा बेडेकर या वयाच्या पंच्याहत्तरीतही दररोज काही तास नियमितपणे वाचनालयात येतात. जिद्द, चिकाटी, आणि कामावरील निष्ठेमुळे केवळ कुटुंबीयच नव्हे तर शहरातील हजारो नागरिकांचे प्रेम आणि आदर त्यांनी मिळविला. मनोरंजन वाचनालयात येणा-या अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. कोणत्याही संकटांना न भीता धैर्याने सामोरे जाण्याचा मोठा धडा त्यांनी त्यांच्या आचरणातून दिला. वाचनालयात त्यांच्याभोवती नातेवाईक, वाचक आणि सहृदांचा गराडा असतो. ग्रंथालयातील सेविका तत्परतेने त्यांना सहकार्य करतात. १९७० मध्ये दिवाळी अंकांच्या सक्र्युलेटिंग लायब्ररीपासून त्यांनी ही ग्रंथसेवा सुरू केली. तेव्हापासून जोडलेली माणसे अजूनही त्यांच्या संपर्कात आहेत. अरूण मालपेकर अगदी सुरूवातीपासून या वाचनालयात अंक आणून देतात. गो.नी.दांडेकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. विनया जंगले आदी नामवंत लेखकांनी वाचनालयास भेट दिली. मनोरंजन ग्रंथालय हे आपलं दुसरं घर असल्याचंच शैलजा बेडेकर सांगतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading