ठाण्यातील वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहाय्याक आयुक्तास २० लाख रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. एका उपाहारगृहाचं गेल्या वर्षाचे मुल्यांकन टाळण्यासाठी तसेच नवे वस्तू आणि सेवा कराचे खाते काढून देण्यासाठी २० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ यांना काल ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या उपाहारगृहाचे मुल्यांकन टाळण्यासाठी तसेच नवे वस्तू आणि सेवा कराचे खाते काढून देण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी शिरसाठ यांनी केली होती. कापुरबावडी भागात हे उपाहारगृह आहे. शिरसाठ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारांनी थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ८ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याची पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचून २० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना शिरसाठ यांना ताब्यात घेतले.