गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला वर्सोवा पूल नागरिकांसाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुंबई ते सुरत असा ४ मार्गिकेचा पूल खुला करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे. राजन विचारे यांनी या पुलाची पाहणी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी मुकुंदा अत्तरडे, अभियंते आणि अधिका-यांसमवेत काल केली. राष्ट्रीय महामार्ग ८ वरील वर्सोवा येथील धोकादायक झालेल्या पुलाची तात्पुरती डागडुजी करून त्याठिकाणी ९७० मीटर लांबीचा ४ लेन असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्याठिकाणी फक्त पूल जोडण्याचे काम बाकी असून एकूण मार्ग २.२५ किमीचा आहे. या वर्सोवा पुलाच्या कामाचे २०१८ मध्ये भूमिपूजन होऊन सुद्धा या कामास सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यासाठी सतत पाठपुरावा आणि पत्रव्यवहार सुरु होता. त्यानंतर २०१९ मध्ये वन खात्याच्या अंतिम परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली. कोविडमध्ये सुद्धा या रस्त्याच्या मार्गिकेचे काम सुरू ठेवण्यासाठी विचारे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुरावाला यश आले असून या पुलामुळे मुंबई, ठाणे तसेच सुरतकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळून त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. या मार्गावरून दररोज सव्वा लाख गाड्या ये-जा करीत आहेत. फाऊंटन हॉटेल समोरील सर्व्हिस रोड रस्ता एम एस आर डी सी कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्या नंतर राजन विचारे यांनी या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मिळवून दिला. त्याचे आत्ता काम सुरु झाले असून येत्या ६ महिन्यात या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं.