वर्तकनगर मधील पोलिसांच्या बाबतीत शासनाची भुमिका सकारात्मक

सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना मोफत घरे उपलब्ध करून देता येणार नाहीत पण वर्तकनगर मधील पोलिसांच्या बाबतीत शासनाची भुमिका सकारात्मक राहील असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वर्तकनगर येथील पोलिसांच्या कुटुंबियांना घरे देण्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस यांनी हे आश्वासन दिलं. आमदार प्रताप सरनाईक यांनी १९७० च्या दशकात राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पोलिसांच्या वसाहतीची दुर्दशा सांगितली. तसेच २०१८ साली तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: वर्तकनगर मधील धोकादायक झालेल्या या इमारतींना भेट दिली असता इमारती कोसळून जिवितहानी होऊ नये म्हणून एम.एम.आर.डी.ए.च्या रेंटल हौसिंग स्कीमच्या घरांमध्ये पोलिस कुटुंबिय स्थलांतरीत झाले होते. परंतू, गेल्या तीन वर्षांपासून पोलिस वसाहतीच्या इमारती तोडून ठेवलेल्या असताना सुध्दा म्हाडाच्या काही अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे अद्यापपर्यंत या इमारतींचे काम चालू झाले नसल्याची नाराजी व्यक्त करून किमान म्हाडा नाही तर पी.पी.पी. तत्वावर तरी हा प्रकल्प राज्य शासनाने चालू करून पुर्ण करावा अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणविस यांना केली. त्यावेळी देवेंद्र फडणविस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सभागृहामध्ये वर्तकनगर मधील घरांच्या निर्मितीचे काम म्हाडा अथवा पी.पी.पी. तत्वावर पुढील तीन महिन्यात चालू करून वर्तकनगर मधील पोलिसांना लवकरात लवकर घरे कसे देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशिल राहिल, असे आश्वासन दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading