वन्समोअरच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला दिव्यांग कला महोत्सव

वन्समोअरच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिव्यांग कला महोत्सव गडकरी रंगायतनमध्ये जोरदार रंगला. ठाणे महापालिकेतर्फे दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत ठाणे महापौर चषक कला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. दिव्यांग क्रीडा महोत्सव झाल्यानंतर दिव्यांग कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गडकरी रंगायतनमध्ये नृत्य आणि गायन स्पर्धा संपन्न झाली. शहरातील १९ शाळा आणि संस्थांनी या स्पर्धेत सहभागी होऊन या महोत्सवात आपली कला सादर केली. मराठी भावगीतं, भक्तीगीतं सादर करून विद्यार्थ्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. तर रंगमंचावर सादर होत असलेल्या नृत्यांनी प्रेक्षागृहातील रसिकांना ठेका धरायला लावला. प्रत्येक गाण्याला, नृत्याला रसिकांनी दिलेली दाद ही विद्यार्थ्यांना एक वेगळीच दिशा देणारी ठरली. गायन स्पर्धेत पल्लवी पाटीलनं प्रथम, रिध्दी कवठणकरनं द्वितीय तर अथर्व बांदलनं तृतीय क्रमांक पटकावला. एकेरी नृत्य स्पर्धेत दिव्या नायरनं प्रथम, अमित सिंगनं द्वितीय तर जान्हवी साळसकरनं तृतीय क्रमांक पटकावला. समूह नृत्यस्पर्धेत आम्ही ठाकरं ठाकरं या गाण्यावर नृत्य करणा-या जिद्द शाळेच्या मुलांना प्रथम, माऊली माऊली या गाण्यावर नृत्य सादर करणा-या दिव्यांग कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना द्वितीय तर बेकुसूर या गाण्यावर नृत्य सादर करणा-या होलीक्रॉस शाळेच्या मुलांना तृतीय क्रमांक मिळाला. विशेष लक्षणीय पारितोषिक गायन स्पर्धेत श्रेया शिंपी हिनं, एकेरी नृत्यस्पर्धेत एलिसन डिकोस्टानं तर समूह नृत्यस्पर्धेत श्री माँ स्नेहदीप शाळेनं पटकावलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading