‘लोकजागर’च्या माध्यमातून रसिकांसमोर उभा राहिला अवघा महाराष्ट्र

संत साहित्यातून करण्यात आलेले वैचारिक प्रबोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची लयबद्ध मांडणी पोवाडा आणि भारुडाच्या माध्यमातून लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांनी लोकजागर या कार्यक्रमातून सादर करुन ठाणेकरांना भारावून टाकले. दऱ्याखोऱ्यातील महाराष्ट्राची वैविधता त्यांनी लोकजागरमध्ये मांडत अवघा महाराष्ट्र रसिकांसमोर उभा केला. निमित्त होते ठाणे महापालिकेने महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘लोकजागर’ या कार्यक्रमाचे. यावेळी लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा.गणेश चंदनशिवे यांचा सन्मान करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते ते विचार शाहिरांनी आपल्या कवनांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड उगारुन तथाकथित मनुवादी समाजाला धडा शिकवला. बुरसटलेले विचार, खोट्या कल्पना, कर्मकांडांना छेद दिला. मग तो काळाराम मंदिराचा प्रवेश असेल की महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन आंदोलन असेल. यासारख्या आंदोलनातून त्यांनी अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. बाबासाहेबांच्या याच विचारांनी प्रेरित होवून पुढे अनेक समाजसुधारक, लोककलावंत आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित व्हायला लागले. त्यातील लोककलावंतातील एक भटकी जात म्हणजे रायरंद. ही मंडळी बाबासाहेबांचे विचार सांगत फिरायची, बहुरुप्याचे सोंग घेवून उंटावरुन यायचे, चावडीवर थांबायचे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करीत हे लोक प्रबोधन करीत असल्याचे सांगत प्रा. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला.
बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून रायरंद जमातीने समाजाला स्वाभिमान शिकविला, आम्ही जसे दुसऱ्याच्या दरवाजात धर्मदान मागण्यासाठी जात नाही तसे तमाम आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांची कास धरुन दुसऱ्याच्या दारात न जाता स्वाभिमान बाळगावा, त्यांची मेलेली जनावरे न ओढता शिक्षण घेवून पुढे जावे असा संदेश ते प्रबोधनात्मक गीतातून देत असायचे, आणि म्हणूनच दलित समाजातील अनेक कलावंत या रायरंदाची कास धरुन अनेक शाहिर या चळवळीकडे आकर्षिक होत गेले. बाबासाहेबांच्या विचारांवर पूर्वीच्याकाळी शाहिरांनी कवने केलेली आहेत. आता कव्वाल्यांनी वाट लावली, त्या व्यक्ती केंद्रीत झाल्या, विचार हा मरायला लागला असल्याची खंत व्यक्त करीत पूर्वीचा शाहिर निरक्षर जरी असला तरी त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती असल्याचे प्रा. गणेश चंदनशिवे यांनी नमूद केले.
‘आली गोळी छातीवर घेईन मी..
पाणी चवदार तळ्याचे पिईन मी…’
बाबासाहेबांचे विचार हे मोत्यासारखे आहेत, या विचारांना कुठेही तडा जाता कामा नये. वर्णव्यवस्थेने जो काही छळवाद मांडला होता, त्या छळवादावर ‘मावशी’ हे पात्र जलस्यातून मार्मिक भाष्य करायचे, जलसामध्ये गण आला, वंदन गीत आले. जलसातील गण आणि गौळण निघून गेले, पण ‘मावशी’ हे पात्र कायम राहिले आणि ते सूत्रधाराची भूमिका करायचे. हे जे संचित आहेत, ते आज लोप पावत चालले आहे. आजच्या जागतिकीकरणामध्ये या पूर्वीच्या अस्तगंत पावलेल्या कलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून आमच्यासारखे लोककलावंत अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही चंदनशिवे यांनी सांगितले.
ज्यांच्या विचारात बाबासाहेब आहेत, ज्यांच्या मेंदूमध्ये, डोक्यामध्ये बाबासाहेब आहेत. त्याची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. दहाव्या बाराव्या शतकामध्ये चक्रधराने परिवर्तनाची जी पताका हाती घेतली होती, ज्ञानेश्वरापासून एकनाथापर्यत, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सेनामहाराज यांनी समाजामध्ये चाललेल्या खुळचट रुढी, अंधश्रद्धा यावर मार्मिक भाष्य करण्याचे काम केले आहे. खऱ्या परिवर्तनाची पताका ही वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो, पुरूष आणि स्त्रियानांही माऊली म्हटले जाते ही ताकद असल्याचे सांगत संत जनाबाईचा विचार त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून सादर केला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading