रेल्वे स्थानक स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम

ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रुपांतर केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी या प्रकाराची पोलखोल केल्यावर रेल्वे प्रशासनाने पंचनामे केले आहेत. या प्रकरणी वाघुले यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल यांच्याकडे तक्रार केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज सहा लाख प्रवाशांची वर्दळ आहे. मात्र, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून परिसरात फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर फेरीवाल्यांना बसू न देण्याचे आदेश दिले असतानाही, या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानक परिसरात ठाण मांडले आहे. या संदर्भात सातत्याने तक्रारी केल्यानंतरही जुजबी कारवाई केली जात असल्यामुळे फेरीवाल्यांची मुजोरीत वाढ झाली आहे. रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहाच्या आवारात फेरीवाल्यांकडून माल ठेवला जात असल्याची माहिती वाघुले यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागात फेरीवाल्यांनी माल ठेवला असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी स्टेशन मॅनेजर आणि रेल्वे पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी कंत्राटदार असलेल्या बूरा कॉन्ट्रॅक्टस् कंपनीच्या कर्मचाऱ्याकडेही चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून मुख्य कंत्राटदाराची चौकशी केली जाणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading