रेल्वे स्थानकातील लिफ्टची तातडीने दुरूस्ती करण्याची संजय वाघुलेंची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकात महापालिकेने प्लॅटफॉर्म क्र. दोनवर उभारलेली लिफ्ट बंद पडल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांसह हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले असून, महापालिका आयुक्तांकडे लिफ्टची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे ६ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेने सॅटीस पूल आणि ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ लगत लिफ्ट उभारल्या आहेत. सॅटीस पुलावर बसने जाण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन अन्य प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी नागरिकांना दोन्ही लिफ्ट सोयीच्या आहेत. सध्या सॅटीस पुलाला जोडणारी लिफ्ट सुरू आहे. मात्र, प्लॅटफॉर्म क्र. २ वरील लिफ्ट बंद आहे. त्याचा दररोज हजारो प्रवाशांना फटका बसावा लागतो. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना अन्य ठिकाणच्या लिफ्टकडे जावे लागते. या लिफ्टच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होत असल्याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. या लिफ्टची तातडीने दुरुस्ती करुन दोन्ही लिफ्टची नित्यनेमाने देखभाल राखली जावी, यासाठी उपाययोजना कराव्यात अशी विनंती संजय वाघुले यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading