रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस

रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम महापालिका करणार आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान तलावा जवळ एकही कामगार हजर नसल्याने पालिका आयुक्तांनी कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे महापालिका, दुसऱ्या टप्प्यात एमएमआरडीए आणि तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारच्या अमृत योजनेत काम होणार आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यांची कामे सुरू होणे अपेक्षित होते. पण तसं न झाल्यानं आयुक्तांनी ही नोटीस बजावली आहे. या कामासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. तसेच, सगळी कामे विहित मुदतीत पूर्ण व्हायला हवी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी या आधीच्या पाहणी दौऱ्यात तीन हात नाका येथील चौकात मध्यभागी असलेले सीसीटिव्हीचे खांब, वायरींचे जाळे योग्य ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते काम पूर्ण झाले असून चौक मोकळा झाला आहे. आता त्याच्या सुशोभिकरणास सुरूवात होईल असे बांगर यांनी नमूद केले. वाहतूक पोलिसांनी एका चौकीचीही मागणी यावेळी आयुक्तांकडे केली. त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ॲपलॅब कंपनीच्या चौकात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला. पगार वेळेवर मिळतो का? हातमोजे, गणवेश, मिळतात का? असे प्रश्न आयुक्तांनी त्यांना विचारले. त्यावर, पगार मागे पुढे होतो, वेळेत मिळत नाही, अशी व्यथा त्या कंत्राटी सफाई कामगारांनी मांडली. शिवाय, हातमोजे आणि गणवेशाशिवाय काम करावे लागते असेही ते म्हणाले. आयुक्तांनी याची दखल घेतली आणि पगार, गणवेश, हातमोजे आदी वेळेत मिळण्याबद्दल ताबडतोब उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी, पावसाळ्याशिवाय, वेळोवेळी नालेसफाई झाली पाहिजे, प्रत्येक नाल्यावर दोन्ही बाजूंनी जाळी बसवावी. यासाठी लवकरच शहरभर मोहिम हाती घेतली जाणार आहे. तसेच, नाल्यावर जेथे कल्व्हर्ट असेल त्याचा बाजूला प्रवाहाच्या दिशेने जाळी बसवली जावी. जेणेकरून पाण्यावर तरंगणारा कचरा जाळीला अडकेल आणि शहरात शिरणारा नाला, शहराबाहेर पडेपर्यंत घनकचरा मुक्त करणे शक्य होईल, अशी व्यवस्था लवकरच सर्व नाल्यांवर करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले. मुख्य रस्त्यापासून ते आडवळणाच्या वस्तीपर्यंत सगळीकडे आयुक्तांनी शौचालयांची पाहणी केली. चेक नाका परिसरातील ‘सुलभ’चे व्यवस्थापन असलेल्या शौचालयांपासून ते वागळे इस्टेट मधील वस्तीतील शौचालयांची स्थिती खूप गंभीर असल्याचे निरिक्षण आयुक्तांनी नोंदवले. तसेच, आंबेवाडी येथील शौचालयाच्या अस्वच्छतेबद्दल स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदारांना नोटीसही बजावण्यात आली. शौचालये स्वच्छ असणे, लादी कोरडी असणे, पाण्याची गळती नको, कड्याकोयंडे नीट असणे, व्यवस्थित देखभाल करणे, हात धुण्यासाठी साबण उपलब्ध असणे तसेच, महिलांच्या शौचालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिग मशीन आणि कचरापेटी असणे, यावर आपला कटाक्ष आहे. याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading