राज्य सरकार-महापालिकेत समन्वय नसल्याने कोरोना रुग्णांचे मृत्यू – प्रवीण दरेकरांचा आरोप

राज्य सरकार आणि महापालिकेत समन्वयाचा अभाव असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक मृत्यू घडले आहेत. बेड, ऑक्सिजन आणि अॅम्ब्यूलन्स नसल्यामुळे झालेल्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार आहे असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी आज दौरा केला. भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर, माजिवडा येथील ग्लोबल हॉस्पीटलला भेट दिल्यानंतर, त्यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांबरोबर बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यात सरकार आणि महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली असून दोन्ही यंत्रणात समन्वय नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. पालिकेने हॉस्पीटल उभारले मात्र डॉक्टर-नर्स उपलब्ध नसतील तर हॉस्पीटलचा उपयोग काय. ३०० ते ३५० नर्सची आवश्यकता असताना केवळ ६० ते ७० नर्सच्या साह्याने हॉस्पीटल कसे सुरू राहणार असा सवाल करत त्यांनी हॉस्पीटलसाठी तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध करण्याची मागणी केली. एकीकडे जितो ट्रस्ट सेवा म्हणून हॉस्पीटल चालविण्याचे सांगत आहे. मात्र त्यांचे सल्लागार ५ लाख रुपये मानधन मागत असेल, तर हा सेवाभावनेला डाग लागेल. डॉक्टर आणि नर्स यांना वाजवी मानधन मिळाले पाहिजेच. पण जितो ट्रस्टच्या सेवेच्या माध्यमामागे काही लपले आहे का असा सवाल दरेकर यांनी केला. सिव्हील हॉस्पीटलमध्ये केवळ १५ ते २० व्हेंटिलेटर असून ५० ते ६० व्हेंटिलेटरची गरज आहे याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. ठाणे शहरातील परिस्थिती आठ दिवसांत आटोक्यात न आल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.
कोरोनावर आयुक्तांची बदली हा उपाय नाही. अशा पद्धतीने शिपायांच्या बदल्याही होत नाहीत. त्यामुळे या बदल्यांमागे गौडबंगाल असावे. आयुक्तांच्या बदलीमागे मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांचा निशाणा साधला जातोय का असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. नव्या आयुक्तांनी काम करण्यास सुरुवात केली असून काही दिवसांतच राज्य सरकारने बदली करू नये असा टोला लगावत आयुक्तांना कोरोनाबद्दल जबाबदार धरले जात असेल तर तेथील सत्ताप्रमुखांना का नको असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading