राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचं लवकरच स्थलांतर – त्यामुळे रूग्णालयाची क्षमता वाढणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय दुसरीकडे स्थलांतरीत करावे जेणेकरुन रुग्णालयाचे विस्तारीकरणासाठी अधिकची जागा उपलब्ध होवून रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य होईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या होत्या, या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर इमारतीची पाहणी करुन आढावा घेतला. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असतात. येथे नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधांसाठी जागेची गरज लक्षात घेता राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतीगृह स्थलांतरीत करण्याचे विचाराधीन आहे. यासाठी माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर वा शहर विकास आराखड्यातंर्गत राखीव असलेल्या जागेत विकसकाकडून प्राप्त होणाऱ्या 12 मजली इमारतीत महाविद्यालय आणि वसतीगृह लवकरच स्थलांतरीत करता यावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्त  बांगर यांनी  दिले. माजिवडा येथील ठाणे महापालिकेची पोस्ट कोविड सेंटर इमारत पाच मजली असून पोस्ट कोविडनंतर घ्यावयाची काळजी या संदर्भात समुपदेशन केले जात होते.  सद्य:स्थितीत या ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत, त्यामुळे या इमारतीत बहुतांश जागा मोकळी असून या जागेचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने नियोजन करावे असे आयुक्त बांगर यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान सांगितले.  तसेच नव्याने उपलब्ध होत असलेल्या बारा मजली इमारतीत किंवा पोस्ट कोविड सेंटरच्या इमारतीमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतरीत करावे, या ठिकाणी आवश्यकतेनुसार वर्गखोल्या, प्रयोगशाळेची निर्मिती, कँटीन यासाठी वास्तुविशारद नेमून वैद्यकीय अधिका-यांशी सल्लामसलत करुन महाविद्यालयाचा वास्तुविशारदीय आराखडा तयार करुन निश्चित करुन दिलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण  होतील याची दक्षता घेण्यात यावी याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. पोस्ट कोविड सेंटर येथे सध्या फिजीओथेरपी आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात असून पोस्ट कोविड सेंटर आणि फिजीओथेरपी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये स्थलांतरीत करण्यात यावे असेही निर्देश आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले. भविष्यात नवीन इमारतीमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि वसतीगृह पूर्णपणे स्थलांतरीत झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होणार आहे, या जागेमध्ये  सद्यस्थितीत रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण असणाऱ्या विभागाचे विस्तारीकरण करुन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता पाचशेवरुन एक हजार खाटांपर्यत करणे शक्य होणार आहे. या माध्यमातून अधिक चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करुन देता येईल आणि रुग्णालयामध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल असेही आयुक्तांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading