रस्ते पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती

शहरातील रस्त्याची सद्यस्थिती, सुरु असलेली कामे आणि त्यांचा दर्जा याची पाहणी करीत असताना महापालिका पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. रस्त्याची कामे होत असताना अभियंत्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून काम करुन घेतले पाहिजे. तसेच शहरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा हा चांगला असला पाहिजे असे नमूद करतानाच रस्त्यांची कामे कालमर्यादेत पुर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाचपाखाडी येथील नितीन कंपनी ते तीन हात नाका, कोपरी बारा बंगला, ठाणे जिमखाना परिसर, सरस्वती शाळेजवळील परिसर, गोखले रोड, माजिवडा जंक्शन, सिनेवंडर सर्व्हिस रोड, शास्त्रीनगर वर्तकनगर, रुणवाल नगर आदी ठिकाणच्या कामे झालेल्या रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी केली. या पाहणी दौऱ्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथजवळील रस्त्याच्या काही भागाचे काम अर्धवट असल्याचे निदर्शनास येताच याबाबतचा खुलासा विचारत संपूर्ण रस्त्याचे काम करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्याची कामे करताना रस्ते उंचसखल न राहता रस्त्याची पातळी एकसमान राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. कोपरी बारा बंगला परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा बंगले असून या ठिकाणच्या रस्त्यावर एका सरळ रेषेत साईडपट्टया मारणे, ज्या ठिकाणी उताराची गरज आहे त्या ठिकाणी त्या पध्दतीत कामे करणे, पावसामुळे पाणी साचले तर रस्त्यावर खड्डे पडू शकतात हे गृहित धरुन पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशा पध्दतीने काँक्रीटीकरण, मास्टिक पध्दतीचा वापर करुन रस्त्याची कालमर्यादा जास्तीत जास्त वाढेल अशा दृष्टीने कामे करुन घ्यावीत. लक्ष्मीपार्क ते रुणवालपर्यतंच्या रस्त्यावर लेनमार्किंग करावे. रस्त्यांना खड्डे पडले तर कंत्राटदारासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत समाधान नसेल तर दुरूस्तीशिवाय कोणत्याही कामांची देयके सादर होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या. कोपरी बंगला परिसर, सिनेवंडर येथील सर्व्हिस रोडवरील मशीनहोलची झाकणे तातडीने बसवावीत. तसेच रस्त्याच्या कडेला जे डेब्रीज पडले आहेत, ते हटविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मेट्रोचे काम घोडबंदर येथे सुरू असुन या कामासाठी लागणाऱ्या पोकलेन मशीन या गाडीत टाकून नेण्याऐवजी रस्त्यावरुन नेल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, रस्त्याची नुकसानभरपाई देणेबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्याबाबतही त्यांनी सांगितले. नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे दर्जात्मक झाली आहेत किंवा कसे यासाठी आयआयटीकडून ऑडिट करुन घेण्याबाबतही आयुक्तांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading