यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर-महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून, साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी होवून आनंद लुटत असतात. धार्मिक तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून आनंद साजरा करत असतात. सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मार्गदर्शक तत्वे तयार केली असून नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे शहरात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून आनंद व्यक्त करत असतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमावली तयार केली असून नागरिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, फटाके वाजवू नयेत, जमावाने रस्त्यावर फिरू नये, तसेच वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading