मुख्यमंत्र्यांनी केलं बदलत्या ठाण्याचं सूतोवाच

ठाण्यानेच आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत बसण्याची संधी दिली त्यामुळे ठाणेकरांचे आपण सदैव ऋणी असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी बदलत्या ठाण्याचं सूतोवाच केलं. ठाण्यातील विविध विकासकामांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री असल्यामुळे आता आपल्याला राज्याकडे लक्ष द्यायचं असून ठाण्यातील लोकांनीच आता ठाण्याकडे पहायचं असून आपल्याला ठाण्याची चिंता नसल्याचं सांगितलं. हे आपल्या सगळ्याचं ठाणं असून आता आपण सगळ्यांनी मिळून ठाण्याला खड्डेमुक्त करूया असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना केलं. कचरा मुक्त ठाणे आपल्याला बनवायचं असून त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या समस्यांकडेही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी पालिका आयुक्तांना केल्या. ठाण्यातील रस्ते कॉंन्क्रीटीकरण, चौक सुशोभिकरण, भित्तीचित्र, उड्डाणपूलांची रंगरंगोटी, पूलांवरील रोषणाई तसंच ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज उचलण्याच्या सूचना केल्या. या सगळ्या कामांमध्ये अधिका-यांचाही मोठा वाटा असून क्विलिटी काम करून घेण्याकडे लक्ष द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. लोकं कर भरतात त्यामुळे जे पैसे आहेत ते लोकांचे असून आपल्याला खड्डेमुक्त शहर बनवायचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच शौचालयांची स्वच्छता २४ तास झाली पाहिजे त्याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी पालिका आयुक्तांना केल्या. माझं ठाणे, सुंदर ठाणे तसंच वेगवान ठाणे आपण बनवूया असंही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. ठाणे हा आपला जिव्हाळ्याचा विषय असून ठाणे हे सुंदर, स्वच्छ, खड्डेमुक्त करण्यासाठी झपाटल्यासारखं काम करा, आयुक्तांबरोबरच अधिका-यांनीही आपली जबाबदारी ओळखून ठाण्याचा विकास करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धोकादायक इमारतींचा पुनर्विकासही करायचा असून राज्यसरकार आपल्या सोबत आहे असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading