मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही – जितेंद्र आव्हाड

मुंब्रा येथील 22 इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे. मात्र, मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही. यापुढे नोटीसच काय, सदर इमारतींच्या जवळपासही फिरकू देणार नाही; ज्या नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन आपल्या घरांवर तिरंगा फडकवला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला. मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील 22 इमारतींना रेल्वे प्रशासनामार्फत नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. या इमारतींना अचानक नोटीसा बजावण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांना सांगितले की, मुंबईतील सुमारे 30 हजार झोपड्या आणि मुंब्रा ते कल्याण दरम्यानच्या शेकडो इमारती पाडण्याचे धोरण रेल्वेचे असले तरी आता 40 वर्षानंतर कोणालाही बेघर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकारने माणुसकीची कास धरुन नागरिकांना बेघर करु नये. तसा प्रयत्न झाला तर इमारतींच्या आसपासही रेल्वेच्या प्रशासनाला फिरकू देणार नाही. त्यामुळे या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर रेल्वे प्रबंधकांनी याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. येत्या दिवाळीपर्यंत मुंब्रा रेल्वे स्थानकातील सरकते जिने कार्यान्वित होतील, असे रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांनी आव्हाड यांना सांगितले. रेतीबंदर येथे पादचारी पुलाचे काम सुरु करण्यात येणार असून लवकरच हा पादचारी पुल उभारुन नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रबंधकांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading