मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लवकरच सुविधा पुरवणार..- उप कुलगुरूंचे आ.संजय केळकर यांना आश्वासन

शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये यासाठी ठाण्यातील बाळकुम येथे उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उप केंद्रात दोन आठवड्यात आवश्यक सेवा सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. उपकेंद्रातील पाच शाखांचा लाभ सुमारे ५०० विद्यार्थी घेत आहेत. येथे वीज, उपहारगृह आदी सुविधांची बोंब असल्याने भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार संजय केळकर यांनी तत्काळ मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर कुलकर्णी यांनी दोन आठवड्यात सर्व सुविधा देणार असल्याचे केळकर यांना सांगितले. याबाबत आमदार केळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ठाणे जिल्हा आणि महानगर क्षेत्रातील विद्यार्थ्यांची मुंबईत होणारी पायपीट थांबावी यासाठी ठाण्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून अवघा एक रुपया वार्षिक भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुविधांचा बोजवारा उडाला, अशी माहिती केळकर यांनी दिली. शहराला आणि जिल्ह्याला शैक्षणिक हब बनवण्याचा संकल्प असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील याच शहराचे आणि जिल्ह्याचे आहेत. त्यामुळे उपकेंद्रात लवकरच सर्व सुविधा उपलब्ध होतीलच, शिवाय ते अद्ययावत करण्याचा निर्णयही चर्चेत झाल्याची माहिती केळकर यांनी दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading