ठाणे महापालिका क्षेत्रातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याची देणी थकविल्याप्रकरणी कल्पेश एंटरप्रायझेस, काळ्या यादीत

ठाणे महापालिका क्षेत्रातील सफाई व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याची देणी थकविल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने कल्पेश एंटरप्रायझेस, या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे त्याला पुढील तीन वर्षे ठाणे महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. महापालिकेकडे जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील गट क्रमांक १८ मधील रस्ते साफसफाईचे कंत्राट या कंत्राटदाराकडे होते. त्या गटात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे अंशदान कपात करून त्यात कंत्राटदाराकडील अंशदानाची रक्कम एकत्रित करून भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरणे बंधनकारक आहे. या गटात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्याचे किमान वेतन आणि एप्रिल-२०२२ पासूनची देणी प्रलंबित होती. तसेच, कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना साहित्य आणि सुरक्षा साहित्य साधने उपलब्ध करून दिली गेली नाहीत. यासंदर्भात देण्यात आलेल्या नोटीशीचा खुलासाही सादर करण्यात आला नाही. वारंवार संधी देऊनही या कंत्राटदाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. सफाई कामगार त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले. या सगळ्यांचा विचार करून करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्यात आली आहे. गट क्रमांक १८ मधील ज्या कंत्राटी सफाई कामगारांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने थकित आहेत ती, कंत्राटदारांची शिल्लक देयके आणि सुरक्षा अनामत रक्कम यांच्यातून वळती करून संबंधित प्राधिकरणांकडील कामगारांच्या खात्यात महापालिका जमा करेल. कामगारांची देणी आणि सुरक्षा साधने याच्याविषयी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी भूमिका स्पष्ट केली आहे. कंत्राटी कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारांची मासिक देयके अदा केली जाऊ नयेत, असे स्पष्ट निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading